आधी एन्काऊंटर'ची धमकी? आता तडीपारची कारवाई.! ठाकरे गटाचे शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी 2 वर्षासाठी तडीपार, पोलीसांची कारवाई...
![आधी एन्काऊंटर'ची धमकी? आता तडीपारची कारवाई.! ठाकरे गटाचे शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी 2 वर्षासाठी तडीपार, पोलीसांची कारवाई...](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_6342790559f3d.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : ऐरोली (मुंबई)
नवी मुंबईतील ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांच्यावर अखेर तडीपारची कारवाई करण्यात आली असून, नवी मुंबई पोलिसांनी त्यांना दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. तर मढवी यांच्यावरील या कारवाई नंतर शिवसेनेमध्ये (ठाकरे गट) प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. तर ठाकरे गटाकडून शिंदे सरकारवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाद्वारे म्हंटले आहे की.! एन्काऊंटरची धमकी दिल्यानंतरही शिंदे गटात सामील होण्यास नकार देणारे मातोश्रीचे निष्ठावंत शिलेदार, नवी मुंबईतील ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांच्यावर अखेर खुन्नस काढण्यात आली. ईडी सरकारने त्यांच्यावर आज तडीपारीची कारवाई केली. ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांची ऐरोलीमध्ये मोठी ताकद आहे. 2015 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत मढवी यांच्यासह त्यांच्या पत्नी विनया मढवी आणि मुलगा करण मढवी असे तीन नगरसेवक निवडून आले होते. इतका मोठा जनाधार असलेले लोकप्रतिनिधी आपल्या कळपात सहभागी व्हावेत यासाठी मिंधे गटाचे प्रयत्न सुरू होते. मात्र मढवी यांनी मातोश्रीच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर जुलै महिन्यापासून ईडी सरकारने त्यांची छळवणूक सुरू केली. जुन्या सर्व राजकीय केसेस उकरून काढण्यात आल्या. मढवींवर आणखी दबाव वाढवण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र त्यानंतरही त्यांनी आपली निष्ठा सोडली नाही. त्यामुळे त्यांना तडीपार करण्यासाठी गणेशोत्सवात मढवींवर दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही सर्व छळवणूक सुरू असताना मढवी न डगमगल्यामुळे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी त्यांना मिंधे गटात सामील व्हा नाहीतर तुम्हाला तडीपार करून तुमचा इन्काऊंटर करू, अशी धमकीही दिली. मात्र त्यानंतरही मिंधे गटात न गेल्यामुळे मढवी यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा तडीपारीची कारवाई करण्यात आली. आणि त्यांना ठाणे व मुंबई उपनगरे या जिह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. असं सामनातून सांगण्यात आले आहे.
तर पोलिसांच्या या कारवाईमुळे शिवसेनेत संतापाचा भडका उडाला असून, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पोलिसांच्या माध्यमातून छळ सुरू करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांची भेट घेतली. याप्रसंगी शिवसेना खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर आदी उपस्थित होते. मात्र त्यानंतर मढवी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर शिवसेनेत संताप व्यक्त करण्यात येत आहे.