जनकल्याणाच्या हितार्थ; पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान योजना.! पहा सविस्तर माहिती...

जनकल्याणाच्या हितार्थ; पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान योजना.! पहा सविस्तर माहिती...

प्रतिनिधी : राजेश देवडकर

पुणे : लोककल्याणाच्या व जनसामान्यांच्या हितार्थ केंद्र आणि राज्य सरकारद्वारे पंतप्रधान सुरक्षित मातृत्व मिशन योजना राबवली जात असून, गोरगरीब जनतेला अधिक आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये या हेतूने व या योजनेनुसार गर्भवती महिलांसाठी चांगले आरोग्य आणि स्वतंत्र तपासणी प्रदान करण्याबरोबरच निरोगी मुलांना जन्म देण्याचा प्रयत्न आहे.

योजनेचे प्रमुख उद्दिष्ट.!

संबंधित जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा व स्त्री रुग्णालय स्तरावर स्त्रीरोग तज्ञ तसेच रेडियोलॉजिस्ट  यांच्यामार्फत गरोदर मातांची तपासणी करणे. अतिजोखमीच्या गरोदर माता यांचे वेळेत निदान करणे. त्यांची रक्तक्षय, उच्च रक्तदाब, मधूमेह, इतर संक्रमण आदी आजारांवर वेळेत योग्य उपचार करणे. मातामृत्यू व नवजात बाल मृत्यूदर कमी करणे; हे या योजनेचे  प्रमुख उद्दिष्ट आहे.

लाभाचे स्वरुप.! 

प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला सर्व गर्भवती महिलांची जवळपासच्या सरकारी आरोग्य सुविधांमधील तज्ज्ञ, वैद्यकांकडून प्रसूतीपूर्व मोफत तपासणी केली जाते. 

गर्भवती महिलेची रक्तदाब, हिमोग्लोबीन, रक्तशर्करा आदी तपासण्यांसह अल्ट्रासाऊंड सेवा आदी सेवाही मोफत दिल्या जातात. 

गर्भवती महिलांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. 

कोणतीही गुंतागुंत आढळल्यास, महिलांना योग्य औषधे आणि सल्ला दिला जातो किंवा योग्य स्तरावरील सुविधांसाठी संदर्भित केले जाते. गुंतागुंत, उच्च जोखीम घटक असलेल्या गर्भवती महिलांना विशेष काळजी प्रदान करण्यासाठी त्यांच्या ‘मदर चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड’वर लाल स्टिकर लावण्यात येते.

यासाठी आपण कोठे संपर्क करावा.! :

जवळची एएनएम, आशा कार्यकर्ती

पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत सेवा पुरविणाऱ्या सुविधांच्या यादीसाठी टोल फ्री क्रमांक- १८०० १८० ११०४