बनावट चावीने कारचे लॉक उघडले अन् ५० लाखांची रोकड लंपास चिंबळीतील आरोपी जेरबंद; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरीचा छडा
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड
पिंपरी-चिंचवड
रावेत परिसरात कारमध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या दोघांना रावेत पोलिसांनी अटक केली आहे. बनावट चावीच्या साहाय्याने कारचे लॉक उघडून रोकड चोरण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरीची संपूर्ण ५० लाख रुपयांची रोकड हस्तगत केल्याची माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.५० ते १२.१५ वाजण्याच्या दरम्यान रावेत परिसरातील पुनावळे येथील एका हॉटेलसमोरील सिमेंटच्या सर्व्हिस रोडवर पार्क केलेल्या कारमधून ही चोरी झाली. बनावट चावीने कारचे लॉक उघडून आतील ५० लाख रुपये असलेली बॅग चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखा आणि रावेत पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना एक संशयित कारजवळ येऊन बनावट चावीने कार उघडत असल्याचे आणि रोकड असलेली बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी पुढील तपास केला असता, चोरीची रोकड आणण्यासाठी मुंबई येथे गेलेल्या दोघांपैकी संशयित आरोपी चारुदत्त बंडाळे याला चिंबळी येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने कारची बनावट चावी आपला मित्र प्रसाद बनकर याच्याकडून मिळाल्याचे आणि कारमध्ये ५० लाख रुपये असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
५० लाखांची रोकड हस्तगत
या प्रकरणात प्रसाद शिवाजी बनकर (वय २९, व्यवसाय सुपरवायझर, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) आणि चारुदत्त शिवाजी बंडाळे (वय ३०, व्यवसाय बांधकाम, रा. बंडाळेवस्ती, निगोजे, ता. खेड, जि. पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेली ५० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
या कारवाईत अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि रावेत पोलीस ठाण्यातील पथकाने सहभाग घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या तपासाच्या आधारे अवघ्या काही वेळात गुन्ह्याचा छडा लावण्यात आल्याने या कारवाईची चर्चा सुरू आहे.
vishwanathkeswad