राजगुरुनगरजवळ एसटी बसची स्कुटीला जोरदार धडक; एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या २२ वर्षीय सोनालीचा जागीच मृत्यू! राक्षेवाडी-वाफगाव रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर, नागरिकांचा संताप
खेड प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. वाफगाव-गुळाणीकडे जाणाऱ्या एसटी बसने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सोनाली रोहिदास कुळेकर (वय २२, मूळ रा. भोमाळे) या तरुणीचा बसच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राक्षेवाडी येथील गणेश मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की सोनालीला गंभीर दुखापत होऊन तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक आणि वाहक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संबंधित यंत्रणांनी तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.
अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्णच!
सोनाली अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती. शिक्षणाच्या जोरावर अधिकारी होऊन कुटुंबाला चांगले दिवस दाखवण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र एका भीषण अपघाताने तिच्या स्वप्नांचा आणि आयुष्याचा दुर्दैवी शेवट झाला. तिच्या निधनाने भोमाळे गावावर शोककळा पसरली आहे.
रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे अपघातांना निमंत्रण?
या अपघातानंतर राक्षेवाडी-वाफगाव रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेले अनधिकृत पत्राशेड आणि इतर अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे वाहनांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
प्रशासन आता तरी जागे होणार का?
राजगुरुनगर नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने संयुक्त पाहणी करून रस्त्यावरील अतिक्रमणांबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आज सोनाली गेली, उद्या आणखी कोणाचा जीव जाण्याची वाट प्रशासन पाहणार आहे का? रस्त्यावरील अतिक्रमणे, वाहतुकीचे नियोजन आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण या प्रश्नांकडे आता तरी गांभीर्याने पाहिले जाणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
एका होतकरू तरुणीचे अधिकारी होण्याचे स्वप्न काळाच्या पडद्याआड गेले; मात्र तिच्या मृत्यूमुळे उपस्थित झालेल्या रस्ते सुरक्षेच्या प्रश्नांची उत्तरे प्रशासन देणार का?
vishwanathkeswad