पोलीस कर्मचाऱ्याच्या मृतदेहासाठी नातेवाईकांची प्रतीक्षा! KEM हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप; कारवाईची मागणी

पोलीस कर्मचाऱ्याच्या मृतदेहासाठी नातेवाईकांची प्रतीक्षा! KEM हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप;  कारवाईची मागणी

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड पुणे 

 पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार कै. सुरेश मारुती कांबळे यांच्या निधनानंतर पुण्यातील के.ई.एम. (KEM) हॉस्पिटल प्रशासनाच्या कथित असंवेदनशील कारभाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. उपचारादरम्यान निधन झाल्यानंतरही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास हॉस्पिटल प्रशासनाने विलंब केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शोकाकुल कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागल्याने पोलीस दलातूनही संताप व्यक्त होत आहे.

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कै. सुरेश मारुती कांबळे यांच्या उपचारासाठी ५० हजार रुपये रोख रक्कम हॉस्पिटलमध्ये जमा करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे वैद्यकीय विमा आणि राज्य शासनाची पोलीस आरोग्य योजना (MPKAY) उपलब्ध होती. असे असतानाही आर्थिक आणि तांत्रिक कारणांचा आधार घेत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास विलंब करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रुग्णाच्या मृत्यूनंतर बिलाच्या वादातून मृतदेह रोखून धरणे कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. आधीच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अशा प्रकारच्या कथित वागणुकीमुळे त्यांच्या वेदनांमध्ये आणखी भर पडल्याची भावना व्यक्त होत आहे.

 महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन आक्रमक!

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे पुणे जिल्हा प्रमुख आरिफ एम. शेख यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

KEM हॉस्पिटलच्या संबंधित व्यवस्थापनावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

 कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा!

कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून जबाबदारांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आरिफ एम. शेख यांनी दिला आहे.