खेडमध्ये अवैध धंद्यांचा कथित बाजार तेजीत? मटका-जुगार, पत्त्यांचे क्लब, विनापरवाना दारूविक्रीचा गंभीर आरोप; 'आप'चा थेट पुणे ग्रामीण एसपींना इशारा!
खेड | प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड
खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमके चालतेय तरी काय? मटका-जुगाराचे अड्डे, पत्त्यांचे क्लब, विनापरवाना दारूविक्री आणि नियमबाह्य लॉजिंग व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केल्याने खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा थेट सवाल उपस्थित करत आम आदमी पक्षाने आता या कथित अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
खेड परिसरात विविध प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत, हे धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी पक्षाच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अवैध धंदे सुरू असतील तर स्थानिक यंत्रणा नेमकी करतेय काय?
मटका-जुगारामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा, पत्त्यांच्या क्लबच्या माध्यमातून जुगार सुरू असल्याचा, विनापरवाना दारूविक्री होत असल्याचा तसेच नियमबाह्य लॉजिंग व्यवसाय सुरू असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांची केवळ वरवर चौकशी न करता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांनी आता थेट मैदानात उतरावे!
खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कथित अवैध व्यवसायांची गोपनीय पथकामार्फत तपासणी करावी, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि हे व्यवसाय पुन्हा सुरू होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
या प्रकरणामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध धंदे सुरू असल्याचे आरोप खरे ठरल्यास त्यांना जबाबदार कोण? संबंधितांवर कारवाई होणार का? की या तक्रारीनंतरही परिस्थिती जैसे थे राहणार?
आता प्रश्न फक्त अवैध धंद्यांचा नाही, तर खेडमध्ये कायद्याचा धाक कोण निर्माण करणार, हा आहे!
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक या निवेदनाची दखल घेऊन खेडमधील कथित अवैध धंद्यांविरोधात ठोस कारवाई करतात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
vishwanathkeswad