कामशेतमध्ये दुर्दैवी घटना.! कार पेटली आणि एकाचा होरपळून मृत्यू...
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कामशेत येथील उड्डाणपुलावर धावत्या कारला अचानक भीषण आग लागून एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मध्यरात्री दीडच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी ही कार कामशेतमधील मशीद समोरील उड्डाणपुलावर पोहोचताच अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला... आणि क्षणार्धात गाडीला आग लागली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही सेकंदातच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि संपूर्ण कार ज्वाळांनी वेढली गेली.
या भीषण आगीत कारमधील एका व्यक्तीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीची तीव्रता इतकी होती की मदत पोहोचण्यापूर्वीच सर्व काही भस्मसात झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार वाहनात तांत्रिक बिघाड किंवा इंधन गळतीमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.