आळंदीच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवर काळाचा घाला; दिवेआगर समुद्रात ८ जणांचा बुडून मृत्यू
विशेष प्रतिनिधी News15 मराठी
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. समुद्रातील पाण्याची खोली आणि वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे इयत्ता ११वी आणि १२वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. या गटामध्ये २५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षक, असे एकूण ४८ जण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सहलीदरम्यान काही विद्यार्थी समुद्रात उतरले. मात्र समुद्रातील पाण्याची खोली आणि जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी पाण्यात वाहून गेले. घटना लक्षात येताच स्थानिक नागरिक, वॉटर स्पोर्ट्स कर्मचारी आणि बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली.
आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले
बचाव पथकाच्या प्रयत्नांनंतर समुद्रात बुडालेल्या सर्व आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. घटनास्थळी पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—
1. यश किरण वानखेडे
2. सोहम तुकाराम भांडवलकर
3. तन्मय दत्तात्रय वाहिले
4. कौस्तुभ संदीप दौंड
5. कैवल्य वासनकर
6. राजवीर वहिले
7. प्रणव बनसोडे
8. सुमित अहिरे
आनंदाच्या सहलीवर दुःखाचा डोंगर
सहलीसाठी दिवेआगरला आलेल्या विद्यार्थ्यांच्या गटावर काही क्षणांतच काळाचा घाला आला. समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या या दुर्घटनेने आळंदीसह पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. आठ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या दुर्घटनेनंतर पर्यटनस्थळी, विशेषतः समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थ्यांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. समुद्रात उतरणाऱ्या पर्यटकांना पाण्याची खोली, प्रवाह आणि समुद्राची सद्यस्थिती याबाबत पुरेशी माहिती व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
मात्र दुर्घटनेची नेमकी कारणे आणि सहलीच्या नियोजनासंदर्भातील जबाबदारी याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील पोलीस तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून, आठ निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
vishwanathkeswad