आरटीई प्रवेशासाठी चुकीचे रहिवासी पुरावे? खेडमध्ये १४ पालकांवर फसवणुकीचा गुन्हा; शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाही.

आरटीई प्रवेशासाठी चुकीचे रहिवासी पुरावे? खेडमध्ये १४ पालकांवर फसवणुकीचा गुन्हा; शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाही.

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी कथितरीत्या चुकीची अथवा प्रत्यक्ष वास्तव्यास नसलेल्या पत्त्याची कागदपत्रे रहिवासी पुरावा म्हणून सादर केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील १४ पालकांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांच्या पडताळणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ ते मे २०२६ या कालावधीत राजगुरुनगर येथील पंचायत समिती खेडच्या तालुका स्तरीय समितीसमोर आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेदरम्यान संबंधित पालकांनी आपल्या पाल्यांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी रहिवासासंबंधी कागदपत्रे सादर केली.

या कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर संबंधित पालक प्रत्यक्ष राहत नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शासनाची दिशाभूल करून आरटीईच्या २५ टक्के कोट्यातून प्रवेश मिळविल्याचा ठपका ठेवत संबंधित पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.

या प्रकरणात डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल, आळंदी देवाची तसेच पोतदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेठाण या शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी कागदपत्रे सादर केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 603/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 318(4), 336(3) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.३८ वाजता दाखल झाल्याची पोलिस नोंद आहे.

या प्रकरणातील आरोपी म्हणून गणेश अरुण साळुंखे, सतीश दत्तात्रय गुंड, उत्तरेश्वर आश्रुबा गोचडे, योगेश बबन सातपुते, समीर रामचंद्र गोरे, राहुल भगवान चौधरी, वैभव होणाजी मोहिते, अजय मच्छिंद्रनाथ विरकर, संदीप दादा शिंदे, रमाकांत आनंदराव चव्हाण, दयानंद फकीरप्पा कुंभार, संदीप भीमराव कांदेकर पाटील, निलेश देवराव शेकार आणि अंगद दिलीप राऊत यांचा समावेश आहे.

या प्रकरणाची तक्रार अमोल विजय जंगले, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती खेड यांनी केली आहे. संबंधित १४ पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर तक्रार करण्यात आल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

कागदपत्रांची पडताळणी आता महत्त्वाची

आरटीईच्या २५ टक्के प्रवेशाचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मिळावा, हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. त्यामुळे प्रवेशासाठी सादर होणाऱ्या रहिवासी व इतर कागदपत्रांची अचूकता आणि पडताळणी अत्यंत महत्त्वाची ठरते. खेडमधील या प्रकरणामुळे संबंधित कागदपत्रांची पडताळणी नेमकी कशी झाली, त्यावेळी कोणत्या स्तरावर तपासणी करण्यात आली आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पुढील स्थिती काय आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.