मेदणकरवाडी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई....!
चाकण औद्योगिक परिसरातील मोठ्या गावामध्ये ग्रामविकास अधिकारी यांचा उच्छाद?
![मेदणकरवाडी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई....!](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_634b79f86ea9b.jpg)
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : मेदनकरवाडी ग्रामपंचायतचा ग्रामसेवक एका सदनिकेची नोंद करून घरपट्टी भरून घेण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. ५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक राजाराम दामू रणपिसे ( वय- ५५) याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार १४ ऑक्टोबर २०२२ रोजी केली. गावातीलच एका २६ वर्षीय युवकाच्या वडिलांनी मेदनकरवाडी येथे एक सदनिका खरेदी केली होती, या सदनिकेची नोंद व घरपट्टी जमा करून घेण्यासाठी ग्रामसेवक राजाराम रणपिसे यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे ज्याच्या मालकीची सदनिका आहे त्या संबंधित युवकाने ग्रामसेवक यांच्या विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. मेदणकरवाडी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने पैसे दिल्या शिवाय काम करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. तक्रारदार यांचे नियमानुसार काम असल्याने तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ग्रामसेवक यांची तक्रार केली होती. पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अनेकदा या बाबतची पडताळणी केली. पडताळणी अंती राजाराम रणपिसे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार शुक्रवारी मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपये लाच घेताना ग्रामसेवक राजाराम रणपिसे याला रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणाचा चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.