भरधाव पिकअपच्या धडकेत सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा मृत्यू.! वेगाची किंमत जीवाने मोजली...
नितीन वरगंटीवार | प्रतिनिधी
भंडाऱ्याच्या लाखांदूर शहरात मंगळवारी रात्री भरधाव पिकअप वाहनाने घडवलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरून गेले. शिवाजी टी पॉइंट परिसरात अज्ञात पिकअपने दिलेल्या जोरदार धडकेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव केशव मेश्राम (वय ६२), रा. लाखांदूर हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
शिक्षण क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या आदर्श शिक्षकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. सायंकाळच्या सुमारास मेश्राम हे दुचाकीने लाखांदूरकडे जात असताना चप्राड–लाखांदूर मार्गावरून वेगाने आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की ते सिमेंट रस्त्यावर आदळले; डोक्याला गंभीर मार लागून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.
अपघातानंतर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. मदतीला न थांबता पिकअप चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. नागरिकांनी तातडीने मदत करून मेश्राम यांना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती पसरताच रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला. शिक्षक, माजी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने जमले. निष्काळजी व बेदरकार वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी अज्ञात पिकअप वाहनाविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चालकाचा शोध सुरू आहे. मात्र आरोपी अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.