धगधगत्या स्लीपर बसमध्ये जिवंत जळाले १० ते १२ प्रवासी.! चित्रदुर्ग जिल्ह्यात NH-48 वर भीषण अपघात...
कर्नाटक ब्रेकिंग - ब्युरो रिपोर्ट...
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी पहाटे घडलेल्या एका भीषण रस्ता अपघाताने अवघ्या काही मिनिटांत आनंदाचा प्रवास मृत्यूच्या खाईत लोटला. बंगळुरूहून शिमोग्गामार्गे गोकर्णकडे निघालेल्या खासगी स्लीपर बसचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर कंटेनरशी भीषण अपघात झाला आणि क्षणातच बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.
हिरियूर तालुक्यातील गोरलाथू क्रॉसजवळ भरधाव कंटेनरने अचानक सेंट्रल डिव्हायडर तोडत समोरून येणाऱ्या स्लीपर बसला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बस महामार्गाच्या मधोमध उलटली आणि काही क्षणांतच पेटली. बसमध्ये झोपेत असलेले अनेक प्रवासी बाहेर पडण्याआधीच आगीत अडकले.
आगीचे लोळ आणि काळ्या धुराचे लोट दूरवरून दिसत होते. चालकासह किमान 13 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मृतांचा आकडा 17 पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र घटनास्थळी सुरू असलेल्या तपास, ऑडिट आणि पोस्टमॉर्टेमनंतरच अधिकृत आकडे जाहीर केले जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
या दुर्घटनेत बचावलेले अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीमुळे बचावकार्य प्रचंड कठीण झालं होतं. अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी अथक प्रयत्न करत अखेर आगीवर नियंत्रण मिळवलं.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार कंटेनर चालकाचा निष्काळजीपणा आणि वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे हा अपघात घडल्याचा संशय आहे. चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक रंजीत यांनी घटनास्थळी भेट देत तपासकार्याचा आढावा घेतला असून हिरियूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग 48 वर अनेक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ढिगारा हटवून मदतकार्य पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. या दुर्घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे.