सोलापुरातील केम गावातील आरोग्य यंत्रणा ठप्प? डॉक्टर गायब.! शिपाई आणि कंपाउंडर देतात औषध'उपचार...
ब्युरो रिपोर्ट सोलापूर
सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था दयनीय झाली आहे! आरोग्य सेवा अक्षरशः ठप्प असून, डॉक्टर नेहमी अनुपस्थित, तर कर्मचाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे.
उपचारासाठी येणाऱ्या आजारी रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते, कारण केंद्रात डॉक्टरच येत नाहीत! सर्वात धक्कादायक म्हणजे औषधोपचाराचे काम डॉक्टरांऐवजी शिपाई आणि कंपाउंडर यांच्या हातात गेले आहे!
प्रमाणित वैद्यकीय अधिकाऱ्याशिवाय औषधे देणे हा कायद्याने गुन्हा असतानाही हा प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चुकीचे औषध दिल्याने काही रुग्णांची तब्येत बिघडल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तपास व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, तातडीने उपाय न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास केम गावातील आरोग्य व्यवस्था ही रुग्णांसाठी मृत्यूचा सापळा ठरेल, अशी ग्रामस्थांची भीती व्यक्त केली जात आहे!