बेकायदा गॅस सिलिंडर विक्रीवर मोठी कारवाई.! एजन्सीचा पुरवठा बंद...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड पुणे
हिंजवडी परिसरात बेकायदेशीर आणि चढ्या दराने गॅस सिलिंडर विक्री करणाऱ्या मे. श्री लक्ष्मी भारतगॅस एजन्सीवर प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित एजन्सीचा तत्काळ गॅस पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले असून, वितरण परवानाही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर विक्रीचा अधिकृत परवाना होता. मात्र तपासात गंभीर गैरप्रकार उघडकीस आले.
शासनाच्या नियमांचे उल्लंघन
अनधिकृत व नोंदणी नसलेल्या ग्राहकांना सिलिंडर वाटप
जादा दराने विक्री करून नफा कमावण्याचा प्रकार
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गोंधळ आणि असंतोष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
सध्या संबंधित एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात आला असून, पुढील कठोर कारवाईची शक्यता आहे. प्रशासनाने या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
गॅस सिलिंडर विक्रीत गैरप्रकार करणाऱ्यांवर प्रशासन आता कडक कारवाईच्या मूडमध्ये असून, नागरिकांनीही संशयास्पद प्रकार त्वरित कळवावेत.