PDCC Bank Election | मोहितेंना आणखी एक धक्का देण्यासाठी विरोधक एकवटले; खेडच्या राजकारणात पुन्हा हालचालींना वेग...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,
खेड : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने खेड तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील विविध राजकीय गटांच्या हालचालींना वेग आला असून, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात असलेले राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि त्यानंतरच्या नगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणांमुळे मोहिते पाटील यांच्यासमोर स्थानिक पातळीवर आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत PDCC बँकेची निवडणूक ही त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
राजकीय पटलावर पुन्हा सक्रिय होण्यासाठी मोहिते पाटील यांनी हालचाली सुरू केल्या असताना, दुसरीकडे त्यांच्या विरोधातील विविध गट एकत्र येण्याच्या शक्यतेने खेडच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. PDCC बँकेच्या निवडणुकीत कोण कोणाच्या बाजूने उभे राहणार, कोणते गट एकत्र येणार आणि कोणत्या नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ही निवडणूक केवळ सहकारी बँकेच्या संचालकपदापुरती मर्यादित न राहता खेड तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारी ठरते का, याचीही उत्सुकता आहे.
मोहिते पाटील यांच्यासाठी सहकार क्षेत्रातील ही लढत प्रतिष्ठेची ठरणार की विरोधकांचे एकत्रित राजकीय गणित त्यांच्यासमोर नवे आव्हान उभे करणार, याचे चित्र निवडणूक प्रक्रियेला वेग आल्यानंतर अधिक स्पष्ट होणार आहे.
आता खरी उत्सुकता एकच PDCC बँकेच्या मैदानात मोहितेंची ताकद भारी पडणार की विरोधकांची एकजूट नवे राजकीय समीकरण उभे करणार?
vishwanathkeswad