खेड तालुक्यात ४५ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारांचे वितरण.! आ. बाबाजी काळे यांच्या हस्ते महाडीबीटी योजनेंतर्गत वितरण सोहळा

खेड तालुक्यात ४५ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारांचे वितरण.! आ. बाबाजी काळे यांच्या हस्ते महाडीबीटी योजनेंतर्गत वितरण सोहळा

प्रतिनिधी  विश्वनाथ केसवड खेड 

खेड : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी, खेड यांच्या अंतर्गत महाडीबीटी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना सन २०२५-२६ अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांचे वितरण दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी मौजे पाडळी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. बाबाजी शेठ काळे यांच्या शुभहस्ते हा वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात तालुक्यातील टाकळकरवाडी, चांडोली, बुट्टेवाडी, कोहिनकरवाडी, काळेचीवाडी, दोंदे, पांगरी पाडळी, चास कमान, चिखलगाव, मिरजेवाडी, कडधे व कान्हेवाडी येथील महाडीबीटी योजनेत निवड झालेल्या ४५ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.

या प्रसंगी महिंद्रा, सोनालिका, जॉन डिअर, स्वराज व मॅसे फर्ग्युसन या नामांकित कंपन्यांचे ट्रॅक्टर वितरित करण्यात आले. तसेच पेरणी यंत्र, रोटावेटर, पलटी नांगर, बटाटा लागवड यंत्र, फणणी यांसारख्या विविध कृषी अवजारांचेही वितरण करण्यात आले.

यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात श्री. प्रवीण शिंदे, उप कृषी अधिकारी (खेड-१) यांनी महाडीबीटी योजनेतील घटकांची माहिती देत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, कांदा चाळ योजनेतील अनुदानाबाबत मार्गदर्शन केले.

श्री. वानखेडे, सहाय्यक कृषी अधिकारी यांनी कृषी महाविस्तार AI अ‍ॅप तसेच कृषी अवजार बँक योजनेची माहिती दिली.

श्री. वैभव विश्वे, तालुका कृषी अधिकारी, खेड यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये मनरेगा फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, पॅक हाऊस योजना आदींचा समावेश होता. तसेच उन्हाळी हंगामासाठी १०० टक्के अनुदानावर भुईमूग बियाण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.

आमदार श्री. बाबाजी काळे यांनी शेतकऱ्यांनी महाडीबीटी अंतर्गत अर्ज करून अनुदानावर उपलब्ध असणारी कृषी अवजारे खरेदी करावीत, असे आवाहन केले. पिकांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. गावोगावी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. प्रकाश पवार (उप कृषी अधिकारी, वाडा), श्री. योगेश परहर (उप कृषी अधिकारी, खेड), श्री. दिनेश सावंत (तालुका समन्वयक आत्मा), श्री. किरण कानडे, श्री. मंगेश किरवे, श्रीमती दिपाली पवार, श्रीमती मोहिनी अकोलकर, श्रीमती वैशाली मिडगुले, श्रीमती पल्लवी कानडे आदी सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती वृषाली पाटील, मंडळ कृषी अधिकारी, खेड यांनी उपस्थितांचे आभार मानले.