राजगुरुनगर नगरपरिषदेत ‘पतीराज’ कारभार? नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतींची अधिकारी - कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत कामात लुडबुड...
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,
राजगुरुनगर : राजगुरुनगर नगरपरिषदेत नव्याने निवडून आलेल्या एका नगरसेविकेच्या पतीकडून थेट नगरपरिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. संबंधित व्यक्ती अधिकृत पदावर नसतानाही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून फाइल्सची चौकशी, कामांचे निर्देश आणि ठेकेदारांशी समन्वय साधत असल्याचे आरोप समोर येत आहेत.
नगरपरिषदेतील काही कर्मचाऱ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, “निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला जातो; मात्र त्यांच्या नातेवाईकांकडून थेट आदेश दिले जात असल्याने प्रशासनावर अनावश्यक दबाव निर्माण होत आहे.” यामुळे निर्णयप्रक्रियेत गोंधळ निर्माण होत असून, काही कामे नियमबाह्य पद्धतीने मार्गी लावली जात असल्याचीही चर्चा आहे.
विशेष म्हणजे, संबंधित नगरसेविका स्वतः बैठकींना उपस्थित असताना देखील त्यांचे पती कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत असल्याचे सांगितले जाते. यामुळे लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या अधिकारांचा वापर नेमका कोण करत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
नगरपरिषद प्रशासनाने याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी, अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाची स्वायत्तता धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. नियमाप्रमाणे, कोणत्याही बाह्य व्यक्तीस प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन, जर नियमभंग सिद्ध झाला तर संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषदेत ‘पतीराज’ संस्कृतीला आळा बसणार का, हा खरा प्रश्न आहे.