सौंदड येथे भीषण अपघात.! ट्रक उलटला - प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह?

सौंदड येथे भीषण अपघात.! ट्रक उलटला - प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह?

भंडारा | प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार

भंडारा–पवनी मार्गावरील सौंदड पुनर्वसन परिसरात दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रेलरचा भीषण अपघात झाला. वेगावर नियंत्रण न राहिल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रक पूर्णपणे नष्ट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेच्या वेळी ट्रकमध्ये चालक आणि क्लिनर उपस्थित होते. या अपघातात क्लिनरला किरकोळ दुखापत झाली असून, स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

मात्र या मार्गावर अपघातांचे सत्र काही नवीन नाही. भंडारा–पवनी मार्ग सातत्याने धोकादायक ठरत असून, वेगावर कोणतेही नियंत्रण नाही, रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजना अपुऱ्या आहेत आणि प्रशासनाचे दुर्लक्ष वारंवार समोर येत आहे.

स्थानिक ग्रामस्थ संतप्त शब्दांत म्हणतात,
“आज सुदैवाने जीवितहानी टळली; पण उद्या कोणाच्या जीवावर बेतले, तर जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने अजून किती अपघातांची वाट पाहायची?”

या मार्गावर कडक वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा, अपघातप्रवण ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी जोर धरला आहे. अन्यथा येत्या काळात यापेक्षा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

भंडारा–पवनी मार्गावरील नागरिक आता न्यायासाठी आवाज उठवत असून, प्रशासनाला लवकरच ठोस पावले उचलावी लागणार आहेत.