विहिरीत पडून ५ वर्षीय अक्षराचा मृत्यू.! प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे बळी?
प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा
भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील कातुर्ली गावात निष्काळजीपणातून एक धक्कादायक घटना घडली आहे. माहितीनुसार ५ वर्षीय निरागस अक्षरा अजित कांबळे ही बालिका घराजवळील उघड्या सार्वजनिक विहिरीत पडून मृत्यूमुखी पडली आहे. तर या घटनेने संपूर्ण गाव हादरला असून, ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार; आई - वडील शेतावर धान कापणीसाठी गेले असता; घरात अक्षरा आणि तिचा ३ वर्षांचा भाऊ अक्षद होते. दोघेही खेळत असताना अक्षरा विहिरीवर लागलेल्या रिंगणाजवळ खेळत होती. पण विहिरीवर कोणतीही सुरक्षित जाळी अथवा आडोसा नसल्याने तिचा तोल गेला आणि ती थेट विहिरीत कोसळली. तीन वर्षांच्या भावाने ही भीषण घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि ओरडत शेजाऱ्यांकडे धाव घेतली.
ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत मुलीला बाहेर काढले.! परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण कातुर्ली गावात हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांचा संताप उफाळला असून, “विहिरीवर सुरक्षितता उपाय का नाहीत?”, असा थेट प्रश्न ग्रामपंचायतीला विचारला जात आहे. उपसरपंच संगदीप अरविंद देशपांडे यांनी मृतक बालिकेच्या कुटुंबीयांना ₹50 हजाराची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,जर ग्रामपंचायत प्रशासनाने मदत केली नाही, तर आम्ही आंदोलन करू.