अड्याळच्या महिलांचा पुन्हा एल्गार.! सरपंचांचे आश्वासन हवेतच; ९ मार्चला ग्रामपंचायतीवर धडकणार 'दुसरा घागर मोर्चा"...
अड्याळ (भंडारा) :
"होळीपर्यंत घराघरात नळाचे पाणी पोहोचेल," असे आश्वाशन देउन शांत केलेल्या अड्याळ येथील वृंदावन लेआउटमधील महिलांची पुन्हा एकदा फसवणूक झाली आहे. सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी दिलेले आश्वासन फोल ठरल्याने आणि १५ दिवसांनंतरही कामाची एक वीटही न हलल्याने येथील रणरागिणींनी आता पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. येत्या ९ मार्च २०२६ रोजी ग्रामपंचायतीवर पुन्हा भव्य 'घागर मोर्चा' काढण्याचा इशारा महिलांनी दिला असून, यावेळी ठोस कृतीशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा घेतला आहे.
वृंदावन लेआउटची निर्मिती होऊन १५ वर्षे उलटली, तरी येथे रस्ते, नाल्या आणि मुख्य म्हणजे पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांचा मागमूसही नाही. या त्रासाला कंटाळून १६ दिवसांपूर्वी दिपाली भिवगडे, हेमलता भिवगडे, अशोक देशमुख यांच्या नेतृत्वात महिलांनी रिकाम्या घागरींसह ग्रामपंचायतीवर धडक दिली होती. त्यावेळी सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी "होळीनंतर पाण्याचा प्रश्न सुटेल" असे आश्वासन देऊन आंदोलन शांत केले होते. मात्र,आश्वासन देउन २० दिवस झाले तरी परिस्थिती 'जैसे थे' आहे.
या प्रकरणात प्रशासकीय उदासीनता आता चव्हाट्यावर आली आहे. वॉर्ड मेंबर जावेद शेख यांनीही सरपंचांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. "वॉर्डातील महिलांच्या बिकट समस्या मी वारंवार सरपंच आणि प्रशासनासमोर मांडल्या, परंतु त्यांनी आमच्या रास्त मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे," असे खळबळजनक मत शेख यांनी व्यक्त केले आहे. लोकप्रतिनिधींच्या या अंतर्गत संघर्षात सर्वसामान्य जनता मात्र पाण्यासाठी होरपळत आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पाण्याची टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. "आश्वासनांचे ढोल वाजवून प्रशासनाने आमची दिशाभूल केली आहे. आता कडक उन्हात मैलोन्मैल पाणी वाहून न्यायचे का?" असा संतप्त सवाल महिला विचारत आहेत. येत्या दोन दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास ९ तारखेला होणारा मोर्चा अधिक तीव्र स्वरूपाचा असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.