आळंदीत दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; ५ तासांत आरोपी जेरबंद...

आळंदीत दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; ५ तासांत आरोपी जेरबंद...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, आळंदी

आळंदी शेजारील केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या चिमुरडीसह वृद्धेच्या निर्घृण हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता.

आळंदी पोलीस आणि क्राईम ब्रँचने अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या ५ तासांत आरोपीला आळेफाटा येथून अटक केली. विनायक तुकाराम भवारी (वय ३२, रा. सिन्नर-संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात ६ वर्षीय धनश्री केदारी आणि तिची काळजी घेणाऱ्या ७९ वर्षीय मंगल शिंदे यांची निर्दय हत्या करण्यात आली होती. चौकशीदरम्यान आरोपीने दोन्ही हत्यांची कबुली दिली आहे.

फिर्यादी संगीता केदारी आणि आरोपी विनायक भवारी यांची दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे विवाहात रूपांतर झाले. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून दोघांमध्ये सतत वाद सुरू होते.

मंगल शिंदे यांना विनायकचे घरात येणे पसंत नव्हते. त्या संगीता केदारीला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगत असल्याचा संशय आरोपीच्या मनात होता.

धनश्री देखील आरोपीला वारंवार आमच्या घरी येऊ नका असे सांगत होती. याच रागातून विनायकने संतापाच्या भरात हे भयानक कृत्य केल्याचे समोर आले आहे.

सामान्य कौटुंबिक वादातून एवढ्या टोकाचे पाऊल उचलत आरोपीने एका निरागस चिमुरडीसह वृद्धेचा जीव घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.

 पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.