मोठी बातमी: खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील महाविद्यालयीन तरुणीचा खून, घटनेने तालुक्यात खळबळ..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मांजरेवाडी (धर्मरायची ) येथील महाविद्यालयीन युवतीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत युवतीचे नाव अपेक्षा वसंत मांजरे असे असून,तीचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. खून करणाऱ्या आरोपी नवनाथ कैलास मांजरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपेक्षा ही नेहमीप्रमाणे "कॉलेजच्या क्लासला चालले " असे सांगून घरातून निघाली होती.मात्र,ती घरी परतली नाही.काळजीत पडलेल्या नातेवाईकांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. राजगुरूनगर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली असता,दुसऱ्या दिवशी मांजरेवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात अपेक्षाचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे,तिची बॅग जवळच्याच एका विहिरीत सापडली.पोलिसांनी प्राथमिक तपासात या प्रकरणाला खुनाचा अंदाज व्यक्त केला आहे. अपेक्षाचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१)(खुन) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून,तपासाला गती दिली आहे.
*अपेक्षा बरोबर काय घडले असावे?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अपेक्षा ही महाविद्यालयातील क्लास संपल्यानंतर घरी जाण्यासाठी राजगुरुनगरच्या पाबळरोड येथे उभी होती.यावेळी आरोपी नवनाथ याने तिला आपल्या दुचाकीवरून घरी सोडण्याची ऑफर दिल्याने अपेक्षा त्याच्यासोबत दुचाकीवर बसून गेली. त्यानंतर तीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी नदीपात्रात मिळून आला.
*पोलिसांचा जलद तपास आणि एक संशयित ताब्यात..
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी नवनाथ याला ताब्यात घेतले.कसून चौकशी केली असता खुनाची कबुली त्याने दिली. मात्र पोलिसांना या तपासात काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली आहे.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणेच्या ससून हॉस्पिटल येथे पाठवला असून,त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणातील अनेक गूढ उकलण्यास मदत होईल,असे पोलिसांचे म्हणणे आहे.
*परिसरात तणावपूर्ण शांतता नागरिकांमध्ये संताप..
अपेक्षाच्या खुनाच्या या घटनेने मांजरेवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.स्थानिक नागरिकांनी या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून अपेक्षाच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते.
सदर घटना मांजरेवाडी गावच्या शांत परिसरात घडल्याने खून झालेली युवती ही शिक्षण घेणारी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याने या प्रकरणाने समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास कसा पुढे जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपासात काय उघड होणार? पोलिसांचा तपास आता वेगाने पुढे सरकत आहे. संशयित तरुणाची चौकशी, शवविच्छेदन अहवाल आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. खून झालेल्या तरुणीच्या बहिणीचा आज साखरपुडा होता घरात आनंदाचे वातावरण असताना अशी अनाकलनीय घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.