राजगुरुनगर नगरपरिषदेत ‘गजब’ कारभार? दलित वस्तीतील लाईटचे खांब काढून नगरसेविकेच्या पतीच्या वार्डात बसवल्याचा आरोप...

राजगुरुनगर नगरपरिषदेत ‘गजब’ कारभार? दलित वस्तीतील लाईटचे खांब काढून नगरसेविकेच्या पतीच्या वार्डात बसवल्याचा आरोप...

प्रतिनिधी :  विश्वनाथ केसवड राजगुरूनगर खेड,

राजगुरुनगर : राजगुरुनगर नगरपरिषद मध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन सैद यांनी केला आहे. दलित वस्तीमधील सार्वजनिक प्रकाशव्यवस्थेसाठी उभारण्यात आलेले लाईटचे खांब काढून ते नगरसेविकेच्या पतीने स्वतःच्या वार्डात बसवल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.

सैद यांच्या मते, या प्रकारात संबंधित अधिकाऱ्यांचेही संगनमत असून, हे प्रकरण उघडकीस आले नसते तर नवीन पोल बसविल्याचे दाखवून नगरपरिषदेकडून बिल काढण्यात आले असते. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दलित वस्तीत अंधाराचे साम्राज्य पसरले असताना दुसऱ्या वार्डात तेच खांब बसविण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सार्वजनिक सुविधा देताना भेदभाव का? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, तसेच दोषी अधिकारी व संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सैद यांनी केली आहे.

दरम्यान, नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही. प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.