शरद पवार तातडीने रुग्णालयात दाखल.! प्रकृतीत बिघाड, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू...

शरद पवार तातडीने रुग्णालयात दाखल.! प्रकृतीत बिघाड, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू...

पुणे || प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना खोकला, घसा खवखवणे, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवत होता.

आज सकाळपासून हा त्रास वाढल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानावरून कार्डियाक अॅम्ब्युलन्सद्वारे शरद पवार यांचा ताफा पुण्याकडे रवाना झाला. रुग्णालयात दाखल होताच रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली तपासणी सुरू करण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासणीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू ठेवायचे की उपचार करून घरी पाठवायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यावेळी त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे तसेच इतर कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, अलीकडील दिवसांत बारामती, पुणे आणि मुंबई येथे सातत्याने दौरे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी, तसेच सततच्या कार्यक्रमांमुळे थकवा आणि आजारपण वाढले असावे. सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरंतर निरीक्षणाखाली आहेत.

त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाणार असून, त्यांच्या तब्येतीसाठी सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.