वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांची अनुपस्थिती.! तळेगाव प्रा. आ. केंद्राचा भोंगळ कारभार?

वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांची अनुपस्थिती.! तळेगाव प्रा. आ. केंद्राचा भोंगळ कारभार?

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

नाशिक - कळवण महामार्गालगत असलेले तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक रुग्ण पोहल्यानंतर तेथे दोन्ही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.कर्मचार्‍यांची अनुपस्थिती तसेच बेशिस्त वर्तणूक यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेचा ठरला आहे. त्यातच आता वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित रहात नसल्याचे निदर्शनास आले असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्राला जाब विचाणारा कुणी वाली आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे नाशिक - कळवण महामार्गावर कार्यरत आहे.कायम अपघातांचे प्रमाण या रस्त्यावर आहे. मागील काही दिवसांपुर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून हाकेच्या अंतरावर बस आणि कारचा अपघाताची घटना आजही ताजी आहे.सोमवार (दि. १९) रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वणी ग्रामीण रुग्णालयात बाबापूर येथील बळवंत लालाजी राऊत यांना दाखल करण्यात आले.तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयाला पाठवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.रुग्णवाहिकेतून सदर रुग्णाला घेवून जात असतांना तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या वाहकाने अत्यावश्यक म्हणून तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका वळवली आणि रुग्ण तपासुन प्राथमिक उपचार करण्याची विनंती केली.परंतू प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर ते्थे कार्यरत असलेले दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने एकच तारांबळ उडाली आणि काही वेळातच सदर रुग्ण देखील मृत पावल्याची घटना घडल्याने तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

या प्राथमिक आरोग्य केंद्रात  कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित रहाणे बंधनकारक आहे.परंतू येथील वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सहाय्यक आदी कर्मचारी स्वत: ची मनमानी करत सेवा बजावत असल्याचे निदर्शनास येत आहे.मागील काही दिवसांपुर्वी ग्रामपंचायतीने देखील काही कर्मचार्‍यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली होती. येणार्‍या रुग्णांबरोबर अरेरावी करत असल्याच्या देखील तक्रारी झाल्या होत्या.तरी देखील त्यात फारसे फरक पडल्याचे दिसून येत नाही,हे विशेष!  संघटनेशी असलेले संबंध, स्थानिक राजकीय लोकांशी असलेले हितसंबंध यामुळे येथील कर्मचारी मनमानी करत असल्याची चर्चा सुरु आहे.याबाबत वरिष्ठ स्तरावरुन दखल घेत दोषींवर कारवाई अपेक्षित आहे.यासाठी  खासदार भास्कर भगरे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विशेष लक्ष केंद्रीत करुन या भोंगळ कारभाराला आळा घालण्याची मागणी नागरिक करत आहेत. 

प्रतिक्रिया...

सोमवारी दुपारनंतर मी स्वत: तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. मला देखील दोन्ही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे मी शेरा लिहीला असून याबाबत त्यांना कारणे दाखवण्याबाबत नोटीस देखील दिली आहे. याबाबत वरिष्ठांना कळवुन आवश्यक ती कायदेशिर कारवाई  केली जाईल.     

सुभाष मांडगे - तालुका वैद्यकीय अधिकारी     

सोमवारी सदर रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता मी स्वत: तेथे हजर होतो. त्यावेळी आमचे दोन्ही वैद्यकीय हजर नव्हते. त्यानंतर तालुकावैद्यकीय अधिकारी यांनी देखील भेट दिली होती. त्यांना देखील तसे निदर्शनास आणून दिले आहे.

बापू चौधरी, आरोग्य सहाय्यक, तळेगाव दिंडोरी