मोहाडी व्याख्यानमालेचा समारोप.! सकारात्मकता जगणे सुंदर करते - व्याख्याते संजय कळमकर

मोहाडी व्याख्यानमालेचा समारोप.! सकारात्मकता जगणे सुंदर करते - व्याख्याते संजय कळमकर

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

आपण आपले आयुष्य जगत असतांना नेहमी उगाचच सुखात दुःख शोधतो.! परंतु आपण आपल्याला आलेल्या दुःखात सुद्धा सुख शोधलं आणि त्या दुःखाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर; आलेल्या दुःखाची तीव्रता कमी होते किंवा दुःख नाहीसे होते. नकारात्मकता आपल्याला दुःखाकडे तर सकारात्मकता आपल्याला सुखाकडे घेऊन जाते. म्हणून आपला नकारात्मकतेकडे नेणारा स्वभाव बदलून काळानुरूप स्वतःत बदल करून, प्रत्येकाला आपल्या जगण्यातली आनंद वाट आपल्यालाच शोधावी लागेल आणि ज्याला ही आनंद वाट सापडली त्याचे जगणे सुंदर बनून जाते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते संजय कळमकर यांनी व्यक्त केले.

मोहाडी (ता.दिंडोरी) येथील श्रीकृष्ण जन्माष्टमी,ग्रामदैवत मोहाडमल्ल व कान्होबा यात्रोत्सवानिमित्ताने येथील पुरातन अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशनच्यावतीने आयोजित ६९ व्या व्याख्यानमालेचे समारोप पुष्प ' जगण्यातल्या आनंद वाटा या विषयावर गुंफतांना बोलत होते. हे पुष्प (कै.)रंगनाथ भगवंत जाधव उर्फ एमपी नाना यांच्या स्मृतीला ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता म्हणून अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी भास्कर जाधव,विलास पाटील,अशोक कळमकर,पुंडलिक कळमकर,पोलीस प्रमोद मुंढे, विजय जाधव,संजय जाधव आदींसह ग्रामस्थ,महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सह्याद्री देवराई सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन तर व्याख्यानास नियमित उपस्थित असणाऱ्या पस्तीस महिलांचा लकी ड्रॉ पद्धतीने भेटवस्तू देऊन प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. तर आयोजकांच्या वतीने व्याख्यानास उपस्थित असणाऱ्या नववी दहावी व अकरावी बारावी या दोन गटातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच व्याख्यानमालेसबंधी विषय देऊन निबंध स्पर्धा घेण्याचे व भरघोस बक्षिसे देण्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शिव्यांना आपल्या आयुष्यातून हद्दपार करण्याची शपथ घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ.विलास देशमुख,सूत्रसंचलन धनंजय वानले व प्रा.धनंजय देशमुख तर आभार दत्ता सोमवंशी यांनी मानले. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्ट व फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले.