कोंढापुरीत तरुणाचा निर्घृण खून! १२ तासांत हत्येचा उलगडा; श्रीरामपूरमधून आरोपीला अटक, दोन अल्पवयीन ताब्यात

कोंढापुरीत तरुणाचा निर्घृण खून! १२ तासांत हत्येचा उलगडा; श्रीरामपूरमधून आरोपीला अटक, दोन अल्पवयीन ताब्यात

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड शिक्रापूर,

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडोबा मंदिरासमोरील तलावाच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवत शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या खुनाचा उलगडा केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील बेलापूर बायपास परिसरातून प्रथमेश नानासाहेब राऊत याला अटक केली असून, दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे.

तलावाच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

बुधवारी, दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास कोंढापुरी गावच्या हद्दीत खंडोबा मंदिरासमोरील तलावाच्या कडेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

मृतदेहाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक जखमा आढळून आल्या. पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी तातडीने दोन पथके रवाना केली. तपासादरम्यान मृत तरुणाची ओळख महेंद्र लव सकट (वय २४, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) अशी पटली.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपींचा माग

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे रांजणगाव परिसरातील तिघांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला.

संशयित अहिल्यानगर जिल्ह्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बायपास परिसरात तिघेही संशयित आढळून आले. पोलिसांनी प्रथमेश नानासाहेब राऊत याला अटक केली, तर दोन अल्पवयीन बालकांना पुढील तपासासाठी ताब्यात घेतले.

वादातून खून केल्याचा प्राथमिक तपासात संशय

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृत महेंद्र सकट, आरोपी आणि दोन्ही अल्पवयीन एकमेकांच्या परिचयातील होते. कोणासोबत फिरायचे आणि कोणाशी बोलायचे, या कारणावरून मृत तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये वाद असल्याची माहिती समोर आली आहे.

याच वादातून महेंद्र याला गांजा पिण्याचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेण्यात आल्याचा संशय आहे. तेथे दोन चाकूंच्या साहाय्याने त्याच्यावर १८ ते २० वार करून खून केल्याची माहिती चौकशीतून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, खुनामागील नेमके कारण आणि प्रत्येक संशयिताची भूमिका याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

शिक्रापूर पोलिसांची पथके तपासात सक्रिय

या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनमंतराव गिरी, राहुल देशमुख आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन सुद्रिक, राहुल गडदे पुढील तपास करीत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यापासून ते श्रीरामपूरपर्यंत आरोपींचा माग काढण्यापर्यंत शिक्रापूर पोलिसांनी केलेल्या तपासामुळे गंभीर खुनाचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला. या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.