खराबवाडीत अवैध गॅस साठवणुकीचा पर्दाफाश; 81 गॅस टाक्या जप्त, दोघांना अटक...

खराबवाडीत अवैध गॅस साठवणुकीचा पर्दाफाश; 81 गॅस टाक्या जप्त, दोघांना अटक...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण, 

खेड तालुक्यातील खराबवाडी येथील ‘जय गणेश भारत गॅस’ वितरकावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने धाडसी कारवाई करत अवैध गॅस साठवणूक आणि काळाबाजाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 81 गॅस टाक्या जप्त केल्या असून, सुमारे 300 ते 400 किलो गॅसचा साठा हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने खराबवाडी येथील गॅस एजन्सीवर अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान गॅस सिलिंडरची अनधिकृत साठवणूक, नियमांचे उल्लंघन तसेच काळाबाजारासाठी गॅसचा वापर केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आला. यानंतर संपूर्ण परिसराची झडती घेऊन मोठ्या प्रमाणात गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही सिलिंडर पूर्ण भरलेले तर काही अर्धवट भरलेल्या अवस्थेत आढळून आले. या अवैध साठवणुकीमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता. गॅससारख्या ज्वलनशील पदार्थाचा नियमबाह्य साठा केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

या प्रकरणी सरजन प्रकाश हस्करे आणि कुणाल संतोष हजारे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच अवैध गॅस विक्रीचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवाडकर, पांडुरंग देवकाते, पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे तसेच अंमलदार गणेश सावंत, गणेश कोकणे, विनोद वीर, विशाल गायकवाड, अमर कदम आणि नितीन लोखंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिसांच्या या धडक कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, अवैध व्यवसायांविरोधात अशाच कठोर कारवाया सुरू ठेवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.