गाडी धुण्यावरून तुंबळ हाणामारी! पाणी वाचवण्याचा सल्ला दिला अन् सोसायटीत राडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

गाडी धुण्यावरून तुंबळ हाणामारी! पाणी वाचवण्याचा सल्ला दिला अन् सोसायटीत राडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

प्रतिनिशी : विश्वनाथ केसवड आळंदी,

राज्यासह शहराच्या विविध भागांत पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, आळंदी लगतच्या चऱ्होली गावच्या हद्दीतील एका सोसायटीत गाडी धुण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट तुंबळ हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. गाड्या धुण्यासाठी नळाला पाइप लावण्यास विरोध करत पाणी वाचवण्याचा सल्ला दिल्याने दोन गटांत वाद झाल्याचे समोर आले आहे.

गाडी धुण्यावरून वादाची ठिणगी

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सोसायटीच्या पार्किंगमध्ये नळाला पाइप लावून गाड्या धुतल्या जात होत्या. यावेळी पाण्याची बचत करण्यासाठी पाइपऐवजी बादलीचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला. मात्र, या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्याने त्याचे रूपांतर लाथाबुक्क्यांच्या हाणामारीत झाल्याचे सांगितले जात आहे.

पाण्याच्या मुद्द्यावरून थेट पोलीस ठाणे

या घटनेनंतर प्रकरण आळंदी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून, दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे गाडी धुण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद आता पोलीस तपासाच्या कक्षेत आला आहे.

पाणीटंचाईच्या काळात सामाजिक भान हरवले का?

एकीकडे पाणीटंचाईचे संकट, दुसरीकडे पाण्याची उधळपट्टी टाळण्याच्या सूचना आणि त्याच मुद्द्यावरून सोसायटीत झालेली हाणामारी, यामुळे नागरिकांच्या सामाजिक जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाणी वाचवण्याचा सल्ला देण्यावरून वाद घालण्याऐवजी सामंजस्याने प्रश्न सोडवणे अपेक्षित असताना, अशा घटनांमुळे सोसायटीतील सलोख्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना, पाणी वाचवण्याच्या मुद्द्यावरूनच हाणामारी होणे ही चिंतेची बाब आहे. चऱ्होलीतील या घटनेची नेमकी पार्श्वभूमी आणि पुढील पोलीस तपासात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.