तुकाराम मुंढेंच्या कारवाईविरोधात औषध विक्रेते आक्रमक! सरकारला अल्टिमेटम; दुकाने बंद किंवा दिवसाला फक्त ८ तास सुरू ठेवण्याचा इशार
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड
पिंपरी - चिंचवड,
राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) सुरू असलेल्या कारवाईवरून औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या भूमिकेविरोधात औषध विक्रेता संघटना आक्रमक झाली असून, प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर संघटनेने गंभीर आक्षेप घेतला आहे.
औषध दुकानांमधील किरकोळ त्रुटींवरही कठोर कारवाई केली जात असल्याचा आरोप औषध विक्रेता संघटनेने केला आहे. नियमांचे पालन करण्यास संघटनेचा विरोध नसून, किरकोळ चुका आणि गंभीर स्वरूपाच्या उल्लंघनांमध्ये फरक ठेवून कारवाई व्हावी, अशी भूमिका विक्रेत्यांकडून मांडली जात आहे.
या कारवाईमुळे राज्यातील औषध विक्रेत्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सरकारने संघटनेच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर राज्यभरातील औषध दुकाने बंद ठेवण्याचा किंवा दिवसातून केवळ आठ तासच सुरू ठेवण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचा इशारा संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी दिला आहे.
औषध दुकाने बंद राहिली तर रुग्णांचे काय?
औषध विक्रेत्यांच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णांच्या औषध उपलब्धतेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. विशेषतः नियमित औषधे घेणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन परिस्थितीत औषधांची गरज असणाऱ्यांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.
एकीकडे औषध विक्रेत्यांकडून कारवाईच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे औषधांच्या विक्रीत नियमांचे पालन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही महत्त्वाचा आहे.
आता औषध विक्रेता संघटनेच्या मागण्यांवर राज्य सरकार आणि अन्न व औषध प्रशासन काय भूमिका घेणार? प्रशासन आणि औषध विक्रेते यांच्यात तोडगा निघणार की राज्यभरातील औषध विक्रीवर निर्बंध येणार? याकडे औषध विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
vishwanathkeswad