ACB चा दणका! सातबाऱ्याच्या नोंदीसाठी ₹२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; मंडल अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल!
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड मुळशी,
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात लाचखोरीचा प्रकार समोर आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. घोटावडे येथील मंडल अधिकारी रोहिणी शशांक गुप्ते यांच्याविरुद्ध लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईनंतर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केमसेवाडी येथील खरेदी केलेल्या जमिनीच्या दोन नोंदी सातबारा उतारा आणि फेरफार उताऱ्यावर घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने ACB पथकाने पडताळणी केली असता, पाच हजार रुपयांची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. त्यानंतर संबंधित मंडल अधिकाऱ्याला पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
महसूल विभागातील लाचखोरीला आळा बसणार का?
सामान्य नागरिकांना सातबारा, फेरफार आणि जमीन नोंदींसारख्या कामांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अशा कामांसाठी लाचेची मागणी होत असल्याचे आरोप समोर येणे ही गंभीर बाब आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ACB आणि पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.
vishwanathkeswad