खेडमध्ये भरदिवसा रक्तरंजित थरार! तिन्हेवाडी-सांडभोरवाडीत कंत्राटदारावर कोयत्याने सपासप वार! तिघांचा जीवघेणा हल्ला; तरुण ICU मध्ये, हल्लेखोरांचा शोध सुरू!
खेड | प्रतिनिधी – विश्वनाथ केसवड
खेड तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तिन्हेवाडी-सांडभोरवाडी गावच्या हद्दीत भरदिवसा तीन अज्ञात इसमांनी एका २६ वर्षीय कंत्राटदार तरुणावर कोयत्याने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. डोकं, दोन्ही हात आणि छातीवर गंभीर वार झाल्याने तरुण रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शिवम बाळासाहेब करमारे (वय २६, रा. आरुडेवाडी, ता. खेड) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) दुपारी सुमारे २:४३ वाजण्याच्या सुमारास शिवम हा तिन्हेवाडी रोड परिसरात असताना तीन अज्ञात इसमांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी कोयत्याने त्याच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर आणि छातीच्या उजव्या बाजूला सपासप वार केले. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेला शिवम रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला.
फोन आला अन् नातेवाईक घटनास्थळी धावले!
घटनेच्या वेळी शिवमचा चुलत भाऊ आदित्य काळुराम करमारे (वय २४, रा. पाचारणेवाडी) हा थिगळस्थळ येथे होता. त्याला मित्र ऋषिकेश यांचा फोन आला. 'तुझ्या भावावर तिघांनी कोयत्याने वार केले असून तो तिन्हेवाडी रोडवरील माझ्या घरासमोरील रस्त्यावर पडला आहे,' अशी माहिती मिळताच आदित्यने घटनास्थळी धाव घेतली.
तेथे शिवम गंभीर जखमी अवस्थेत आढळला. नागरिकांनी तत्परता दाखवत रुग्णवाहिका बोलावली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले.
तीन हल्लेखोर कोण? हल्ल्यामागचे कारण काय?
भरदिवसा एवढ्या निर्घृण पद्धतीने हल्ला करण्याचे धाडस हल्लेखोरांनी नेमके कोणत्या कारणातून केले? पूर्ववैमनस्य, आर्थिक वाद की अन्य काही कारण? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तीन अज्ञात हल्लेखोरांनी नियोजनपूर्वक हल्ला केला होता का, याचाही तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
खेड पोलिसांसमोर हल्लेखोरांना पकडण्याचे आव्हान!
या प्रकरणी आदित्य करमारे यांच्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात तीन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जयसिंग कुदळे यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
भरदिवसा रस्त्यावर तरुणावर कोयत्याने हल्ला होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. हल्लेखोरांना तातडीने अटक करून या हल्ल्यामागचे नेमके सत्य समोर आणण्याचे आव्हान आता खेड पोलिसांसमोर आहे.
vishwanathkeswad