जीवाची बाजी लावत आपदा मित्रांचे धाडसी कार्य; खराबवाडीतील विहिरीतून मृतदेह बाहेर
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड | चाकण
खराबवाडी : खराबवाडी गावातील विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्याचे अत्यंत कठीण आणि जोखमीचे काम आपदा मित्र शांताराम गाडे, श्रीकांत विठ्ठल बिरदवडे आणि पोलीस पाटील सचिन भोपे यांनी मोठ्या धाडसाने पार पाडले.
विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढताना मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, प्रसंगावधान, धैर्य आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी हे बचावकार्य यशस्वी केले. या मोहिमेत सावरदरी पोलिसांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
दरम्यान, विहिरीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, या घटनेचा पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस करीत आहेत.
आपत्तीच्या काळात स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत समाजासाठी तत्परतेने पुढे येणाऱ्या आपदा मित्रांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या धाडसाचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आपदा मित्रांच्या या धाडसी आणि निःस्वार्थ सेवेला News 15 मराठीचा मानाचा सलाम!
vishwanathkeswad