चाकणमध्ये मटका - जुगार आड्यांचा धुमाकूळ.! पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह?
प्रतिनिधी - विश्वाथ केसवड चाकण
औद्योगिक शहर म्हणून वेगाने वाढणाऱ्या चाकण परिसरात सध्या अवैध मटका जुगार आड्यांचा सुळसुळाट होत आहे. सार्वजनिक ठिकाणी खुलेआम सुरू असलेले हे आडे थांबवण्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मटका आड्यांचा वाढता प्रभाव...
स्थानिकांच्या मते, शहरातील प्रमुख चौकांपासून ते लहान गल्लीबोळांपर्यंत मटका जुगार खुलेपणे सुरू आहे. दिवसाढवळ्या सुरु असलेल्या या आड्यांवर कारवाई करण्याऐवजी काही ठिकाणी पोलिसांकडून अभय मिळाल्यासारखे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, हा व्यवसाय अधिक बिनधास्तपणे फोफावतो आहे.
तरुण पिढीवर विपरीत परिणाम...
मटका जुगार केवळ आर्थिक नुकसानच करत नाही, तर तरुणाईला चुकीच्या मार्गावर नेतो.
पालक वर्गात याबाबत चिंता वाढली असून, सहज पैसे मिळवण्याच्या लालसेत तरुण आयुष्याचा धोका पत्करत आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर नाकारता येत नाही.
पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न...
पोलीस विभागाने वेळोवेळी अशा ठिकाणी धाडी घातल्या असल्या तरी त्या केवळ औपचारिक राहतात, असा आरोप नागरिकांचा आहे. काही दिवस कारवाई होते आणि नंतर पुन्हा त्याच ठिकाणी मटका व्यवसाय सुरू होतो ही चक्राकार परिस्थिती थांबवण्यासाठी सातत्यपूर्ण आणि कठोर उपाययोजना गरजेची आहे.
नागरिकांची मागणी कठोर कारवाई करा...
चाकणच्या नागरी समाजाचा एकमुखी सूर असा आहे की, या आड्यांवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी आणि दोषींना कायद्याच्या कचाट्यात ओढले जावे.
औद्योगिक आणि प्रगतिशील शहराचा दर्जा राखायचा असेल, तर अशा अनैतिक व्यवसायांना आळा घालणे हीच प्रशासनाची खरी कसोटी ठरेल.