अड्याळ पोलिसांचा सुस्त कारभार; गंभीर गुन्ह्यांतील आरोपी अजूनही मोकाट ?

अड्याळ पोलिसांचा सुस्त कारभार; गंभीर गुन्ह्यांतील आरोपी अजूनही मोकाट ?

प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा

एकीकडे पोलीस प्रशासन गुन्हेगारीमुक्त समाजाचे दावे करत असताना, दुसरीकडे अड्याळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारांनी उच्छाद मांडल्याचे चित्र दिसत आहे. चकारा येथील मिरची केंद्रावरील दिवाणजीवर झालेला प्राणघातक हल्ला असो किंवा कोंढा येथील कापड दुकानातील कोयता प्रकरण; अनेक दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात अड्याळ पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून, “हे पोलिसांचे अपयश नाही तर काय?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी चकारा येथील मिरची केंद्रावर कार्यरत असलेले दिवाणजी विश्वास डोंगरे यांच्यावर अज्ञात आरोपींनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत गुन्हेगारांनी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून दिले. गंभीर जखमी अवस्थेत डोंगरे रात्रभर मदतीसाठी तडफडत होते. सकाळी महिला मजूर कामावर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेला बराच काळ लोटला असला तरी तपास अद्याप ठोस टप्प्यावर पोहोचलेला नाही.

याचप्रमाणे कोंढा येथील गांधी कापड दुकानातही काही दिवसांपूर्वी कोयता घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार घडला होता. भरवस्तीत हत्यार उपसून निर्माण केलेल्या या दहशतीनंतरही संबंधित आरोपी आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अड्याळ पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर या घटना घडत असताना पोलिसांची कारवाई मात्र मंद गतीने सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

सतत गंभीर गुन्हे घडत असताना अड्याळ पोलीस प्रशासन या घटनांकडे कितपत गांभीर्याने पाहत आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींना तातडीने अटक करावी, अन्यथा अड्याळ पोलिसांच्या कार्यपद्धतीविरोधात जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.