महिला आयोगाच्या अध्यक्षांची वन स्टॅाप सेंटर आणि महिला वसतीगृहाला भेट...
![महिला आयोगाच्या अध्यक्षांची वन स्टॅाप सेंटर आणि महिला वसतीगृहाला भेट...](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_63380629911fa.jpg)
मुंबई (सोहम भगत) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी (दि.14) केईएम रुग्णालयातील वन स्टॅाप सेंटर आणि शासकीय नवजीवन महिला वसतीगृह, देवनार येथे भेट देत कामाकाजाचा आढावा घेतला. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियमानुसार आयोगास तुरुंग, सुधारगृह, महिला सहायता केंद्र येथे तपासणी करणे, आवश्यक वाटेल त्याप्रमाणे सुधारात्मक उपाययोजना संबंधित विचारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यानुसार आज वन स्टॅाप सेंटर, वसतीगृहाची पाहणी चाकणकर यांनी केली.
यावेळी आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, उपसचिव दिपा ठाकूर, मुंबई शहर आणि उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली निवारा, वैद्यकीय, पोलिस, समुपदेशन अशी सर्व मदत मिळावी यासाठी देशभरात ‘वन स्टॅाप सेंटर’ कार्यरत आहेत. चाकणकर यांनी केईएम रुग्णालयात असलेल्या वन स्टॅाप सेंटरमधील कामाचा आढावा घेतला. एकुण तक्रारी, समुपदेशन सेवा, निवार्यासाठी दाखल महिला याची माहिती घेतली. दाखल महिलांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. त्यानंतर शासकीय नवजीवन महिला वसतीगृह, देवनार येथे भेट देउन कामकाजाचा आढावा घेत येथे दाखल महिलांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न, सुचना यावर चर्चा केली. महिलांना सकारात्मक वातावरण देणाऱ्या या वास्तूत त्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबवत विविध वस्तू तयार केल्या जातात त्याची ही पाहणी केली. महिलांना सर्वतोपरी सक्षम करण्यासाठी काम करत असलेल्या अधिकार्यांचेही कौतुक केले.
यावेळी बोलताना श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, अडचणीत असलेल्या महिलांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी वन स्टॅाप काम करत असून; एकाच ठिकाणी आवश्यक ती मदत आणि आधार दिला जातो. त्यामुळे महिलांनी अन्याय सहन करु नये व हिंमतीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा; यंत्रणा आपल्या सोबत आहे. वसतीगृहात'ही महिलांना निवारा देण्यासोबतच त्यांचे सर्वांगीण पुनर्वसन केले जात आहे. इथे ज्या गोष्टींची कमतरता आहे, अडचणी आहेत त्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करु असेही त्यांनी सांगितले.