आमदार बाबाजी काळेंनी पत्र जाहीर करत आरोपांवर शिक्कामोर्तब; चौकशीला सामोरे जा, म्हणत माजी आमदार दिलीप मोहितेंना थेट आव्हान...

आमदार बाबाजी काळेंनी पत्र जाहीर करत आरोपांवर शिक्कामोर्तब; चौकशीला सामोरे जा, म्हणत माजी आमदार दिलीप मोहितेंना थेट आव्हान...

प्रतिनिधी :- विश्वनाथ केसवड खेड,

खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेल्या महिन्यात पाठवलेले आपले मूळ पत्र आज माध्यमांसमोर जाहीर करत त्यातील सर्व आरोपांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. या पत्रामुळे खेड तालुका आणि चाकण एमआयडीसी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आमदार काळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पत्रातील सर्व बाबी सत्य परिस्थितीवर आधारित असल्याचा पुनरुच्चार केला.

या पार्श्वभूमीवर आज (६ जून २०२६) माजी आमदार दिलीप मोहिते यांनी चाकण येथे पत्रकार परिषद घेत आमदार काळे यांच्या आरोपांना उत्तर दिले. त्यानंतर आमदार बाबाजी काळे यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत माजी आमदार दिलीप मोहिते यांना थेट आव्हान दिले. जर तुम्ही निष्पाप असाल तर चौकशीला सामोरे जा. तुमचे खायचे आणि दाखवायचे दात तालुक्याला माहिती आहेत,असा घणाघात त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत चाकण एमआयडीसीतील औद्योगिक शांततेला बाधा आणणाऱ्या कथित बेकायदेशीर आंदोलनांचा, बहुराष्ट्रीय कंपन्यांवर टाकल्या जाणाऱ्या दबावाचा आणि कंत्राट व्यवसायातून सुरू असलेल्या कथित खंडणीखोरीचा उल्लेख करण्यात आल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. राज्याच्या औद्योगिक प्रतिमेला आणि हजारो कामगारांच्या रोजगाराला याचा फटका बसत असल्याने शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आमदार काळे यांनी यावेळी टॉपबँड इंडिया कंपनीच्या संदर्भातील काही घटनांचाही उल्लेख केला. काही राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलनांचा वापर केला आणि त्याचा फटका मराठी तरुण अभियंत्यांना बसला, असा आरोप त्यांनी केला. तसेच काही आंदोलने ही ग्रामपंचायत किंवा स्थानिक प्रश्नांपेक्षा कंत्राटे आणि आर्थिक हितसंबंध यासाठीच करण्यात आली होती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना धमकावण्याचे प्रकार आणि त्यामागील कथित सिंडिकेटचे संगनमत याबाबत शासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी. चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल आणि अनेकांचे चेहरे उघडे पडतील, असे आमदार काळे म्हणाले.

यावेळी त्यांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर थेट निशाणा साधत, तडफड करण्याऐवजी चौकशीला सामोरे जा. आम्ही तालुक्याच्या जनतेसमोर सर्व पुरावे मांडणार आहोत. यापूर्वीही मी याबाबत पत्र दिले आहे आणि विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. याचा पाठपुरावा पुढेही करणार आहे, असे स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणामुळे खेड तालुक्यातील राजकारण आणि चाकण एमआयडीसीतील औद्योगिक वातावरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.