राक्षेवाडी घरफोडी प्रकरणाचा छडा; आरोपीसह विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात, ४.९५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त खेड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची यशस्वी कामगिरी
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,
खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे घराचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरण्याच्या प्रकरणाचा खेड पोलिसांच्या गुन्हे शोध (डीबी) पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणात साहिल भांबुरे याच्यासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, चोरीस गेलेले सुमारे ४ लाख ९५ हजार ६५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नेमकी घटना काय?
दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी राक्षेवाडी येथील साई योग अपार्टमेंटमध्ये राहणारे फिर्यादी निलेश बापू जांभळे (वय ३९) यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते. या घटनेप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध
खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यात साहिल भांबुरे आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग निष्पन्न झाला.
त्यानुसार संबंधित बालकाला कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेही हस्तगत करण्यात आले.
कोणता मुद्देमाल जप्त?
पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याचे गंठण, कानातील दागिने, सोन्याची चेन, अंगठ्या तसेच चांदीचे ब्रेसलेट, पैंजण आणि मंगळसूत्राचे पंधरा जोड यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ९५ हजार ६५० रुपये असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी, पोलीस हवालदार संतोष घोलप, पोलीस अंमलदार महेश गोसावी, सूरज राक्षे आणि संकेत कवडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
खेड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने घरफोडी प्रकरणाचा छडा लावत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
vishwanathkeswad