गुटखा विक्रेत्याकडून १ लाख ६५ हजारांची खंडणी; पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित!

गुटखा विक्रेत्याकडून १ लाख ६५ हजारांची खंडणी; पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित!

पुणे प्रतिनिधी 

गुटखा विक्रेत्याला कारवाईची भीती दाखवून खंडणी उकळल्याच्या आरोपावरून पुणे पोलीस दलातील एका पोलीस अंमलदाराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त जीवन बनसोडे यांनी ही कारवाई केली असून, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

रामकिशन धोंडिबा हंबर्डे असे निलंबित पोलीस अंमलदाराचे नाव आहे. रामकिशन हंबर्डे आणि सतीश मोरे यांनी संगनमत करून गुटखा विक्रेत्याला कारवाईची धमकी दिली आणि त्याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप आहे. त्यापैकी १ लाख ६५ हजार रुपये घेतल्याच्या आरोपावरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात ११ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अवैध गुटख्याच्या व्यवसायावर कारवाई करण्याची भीती दाखवून पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, एका किलो काजू बदामाची बेकायदेशीररीत्या ने-आण केल्याबाबत तक्रार आणि या संदर्भातील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची बाबही समोर आली आहे.

या प्रकरणाचा अहवाल फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. या अहवालाची दखल घेत पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या वर्तनाबाबत जनमानसात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आणि पोलीस दलाच्या प्रतिमेवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन संबंधित अंमलदाराला निलंबित करण्यात आले.

पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह!

गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांना आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवरच खंडणीचे आरोप झाल्याने पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अवैध गुटखा विक्रीविरोधातील कारवाईच्या नावाखाली आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप गंभीर असून, या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

संबंधित पोलीस अंमलदाराचे निलंबन ही प्रशासकीय कारवाई असली, तरी या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि कथित खंडणी प्रकरणातील इतर बाबींचा कसा उलगडा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.