साताऱ्यात ज्वेलर्स शॉप फोडून चोरी करणाऱ्या दोघांना अटक; १०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त! सातारा शहर डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई

साताऱ्यात ज्वेलर्स शॉप फोडून चोरी करणाऱ्या दोघांना अटक; १०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त! सातारा शहर डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई

प्रतिनिधी सातारा 

सातारा : सातारा शहरातील गुरुवार पेठेतील शेटे चौक +परिसरात असलेले अवधुत ज्वेलर्स दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि सीसीटीव्ही यंत्रणा चोरणाऱ्या दोन आरोपींना सातारा शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण १० लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ज्वेलर्स दुकानफोडीचा आणि मोटारसायकल चोरीचा असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ओळख लपवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआरही चोरले

दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.४५ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी अवधुत ज्वेलर्सच्या दुकानाच्या शटरची कडी-कोयंडा तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने, सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर चोरून नेला होता. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

चोरी केल्यानंतर आपली ओळख पटू नये, यासाठी आरोपींनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरदेखील चोरून नेल्याचे तपासात समोर आले.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जाळ्यात

या गुन्ह्याचा तपास करताना सातारा शहर डी.बी. पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. संशयित हा सराईत चोरटा असून त्याचा निश्चित ठावठिकाणा मिळत नसल्याने पोलिसांसमोर त्याला पकडण्याचे आव्हान होते.

दरम्यान, एक संशयित विनानंबरच्या दुचाकीवरून राजवाडा परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींनी सातारा शहराच्या हद्दीतून स्प्लेंडर मोटारसायकल चोरली आणि त्याच दुचाकीवरून अवधुत ज्वेलर्स येथे जाऊन चोरी केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीला शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले.

दोन्ही आरोपींची नावे

1. रिहान अन्वर शेख (वय २० वर्षे), रा. ४१८, शनिवार पेठ, तेलीखड्डा, सातारा.

2. शुभम उर्फ सुभाष सुरेश हादगे (वय १९ वर्षे), रा. ५१, केसरकर पेठ, मानस हॉटेलच्या पाठीमागे, सातारा.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जायपत्रे तसेच पोलीस हवालदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, समीर महागडे, पोलीस नाईक पंकज मोहिते आणि पोलीस कर्मचारी तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, वैभव माने व सुशांत कदम यांनी सहभाग घेतला.

सातारा शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे ज्वेलर्स दुकानफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.