औदर येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विविध शेती प्रकल्पांची पाहणी; शेतकऱ्यांसाठी लवकरच विशेष मार्गदर्शन शिबिर
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,
औदर गावातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि विविध कृषी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात तालुका कृषी अधिकारी वैभव विश्ववे, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पवार आणि सहाय्यक कृषी अधिकारी वाघ मॅडम सहभागी झाले.
पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले ट्रॅक्टर, शेततळी तसेच ‘राम कृष्ण हरी शेतकरी बचत गटा’ला देण्यात आलेल्या भुईमूग बियाणे प्रात्यक्षिक प्रकल्पाची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली.
भुईमूग बियाणांच्या प्रात्यक्षिकाची पाहणी करताना अधिकाऱ्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासली. यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. बचत गटाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी परिसरातील प्रमुख पिके असलेल्या सोयाबीन, बटाटा आणि भात पिकांच्या सद्यस्थितीची माहिती कृषी अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना तालुका कृषी अधिकारी वैभव विश्ववे यांनी औदर परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी लवकरच विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र (KVK), नारायणगाव येथील तज्ज्ञ शास्त्रज्ञांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यावेळी तालुका कृषी सदस्य महेश मेदगे, बाळासाहेब मेदगे, सागर मेदगे यांच्यासह ‘राम कृष्ण हरी शेतकरी बचत गटा’चे अध्यक्ष, सदस्य आणि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पाहणी केल्याने तसेच आधुनिक शेतीबाबत विशेष मार्गदर्शन शिबिर घेण्याचे आश्वासन दिल्याने औदर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
vishwanathkeswad