शाळा-महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पान टपऱ्यांवर कारवाई; १८ टपऱ्यांवर पोलिसांचा दणका

शाळा-महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पान टपऱ्यांवर कारवाई; १८ टपऱ्यांवर पोलिसांचा दणका

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड पिंपरी -चिंचवड,

पिंपरी-चिंचवड : शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेट विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ-१ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेट विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांनी दिले होते.

या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून संबंधित टपऱ्यांवर योग्य त्या पोलीस बंदोबस्तात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

कारवाईमध्ये निगडी पोलीस ठाणे हद्दीत ३, चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत २, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे हद्दीत ६, दापोडी पोलीस ठाणे हद्दीत ३ आणि सांगवी पोलीस ठाणे हद्दीत ४ अशा एकूण १८ टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.

शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखून विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता जपण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही प्रभावीपणे सुरू राहतील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली तसेच परिमंडळ-१चे पोलीस उपआयुक्त संदीप आटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.