डी-मार्टवर अन्न प्रशासनाचा मोठा छापा! ५० लाखांचे संशयित खाद्यतेल जप्त; २० हजार लिटर तेलाचा साठा रडारवर!
मावळ | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील आंबी येथील अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड (डी-मार्ट) येथील खाद्यतेलाच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कमी दर्जाचे आणि दिशाभूल करणारे लेबल लावलेले असल्याचा संशय असलेले तब्बल २० हजार ८५ लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. या जप्त साठ्याची किंमत तब्बल ५० लाख २७ हजार ८९३ रुपये असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मौजे आंबी येथील गट क्रमांक ११३ मधील शेड क्रमांक १ येथे अन्न प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली. यावेळी खाद्यतेलाचा मोठा साठा आढळून आला. प्राथमिक तपासणीत तेलाचा दर्जा कमी (सबस्टँडर्ड) असल्याचा तसेच उत्पादनाच्या लेबलवर दिशाभूल करणारी माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
नामांकित ब्रँडच्या खाद्यतेलाचीही तपासणी!
जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये आधारचे रिफाइंड सूर्यफूल तेल, फॉर्च्युनचे राइस ब्रॅन ऑइल, पतंजलीचे कच्ची घाणी मोहरी तेल, तसेच सफोलाचे कोल्ड प्रेस्ड मोहरी तेल आणि शेंगदाणा तेल यांचा समावेश आहे.
अन्न प्रशासनाने या विविध खाद्यतेलांचे एकूण नऊ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच या तेलांचा दर्जा आणि लेबलिंगमधील त्रुटींबाबत अधिकृत निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या सहआयुक्त प्रीती तिपरे आणि पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पुणे गुप्तवार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांनी यासंदर्भात माहिती गोळा केली होती. त्यानंतर सहाय्यक आयुक्त डी. एस. साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ए. बी. भिसे आणि एस. एस. हाके यांच्या पथकाने प्रत्यक्ष तपासणी केली.
प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष; दोष सिद्ध झाल्यास काय कारवाई होणार?
या कारवाईनंतर आता नऊ नमुन्यांच्या प्रयोगशाळा अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत एवढ्या मोठ्या प्रमाणात संशय निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. मात्र, संबंधित खाद्यतेल निकृष्ट असल्याचे अद्याप प्रयोगशाळेच्या अहवालातून सिद्ध झालेले नाही. त्यामुळे अंतिम निष्कर्ष अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
vishwanathkeswad