दुबईतून चालत होता सायबर फसवणुकीचा काळा धंदा! १० ते १२ हजार SIM कार्ड पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, सात आरोपी अटकेत!
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड
पिंपरी-चिंचवड
सायबर गुन्हेगारीच्या जगात खळबळ उडवणारी मोठी कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली आहे. देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी तब्बल १० ते १२ हजार मोबाईल सिमकार्ड पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, या टोळीचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत पोहोचल्याचे तपासात उघड झाले आहे.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात दररोज ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त होत असताना, या गुन्ह्यांच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आरोपी परदेशात राहून वेगवेगळ्या बँक खात्यांचा आणि मोठ्या प्रमाणावरील मोबाईल सिमकार्डचा वापर करून सायबर फसवणुकीचे गुन्हे करत असल्याचे समोर आले.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१७(२), ६१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुबईतून सूत्रे हलवणारा मुख्य आरोपी जाळ्यात!
तपासादरम्यान तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. सानेवस्ती, चिखली, पुणे) आणि आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी, पुणे) यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.
तपासात सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण, पुणे) हा मुख्य आरोपी दुबईतून सायबर फसवणुकीचे जाळे चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरोधात पाठपुरावा करून एलओसी आणि इंटरपोलच्या माध्यमातून माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर मुंबई विमानतळावरून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
१० ते १२ हजार सिमकार्डचा पुरवठा!
या टोळीला सायबर गुन्ह्यांसाठी लागणारी मोबाईल सिमकार्ड पुरवणाऱ्या मनिष अशोलाल वाधवा (वय ४४, रा. अंबरनाथ पूर्व, मुंबई) आणि महेश कन्हैयालाल चौथरामानी (वय ६०, रा. कल्याण पश्चिम, मुंबई) यांनाही तांत्रिक तपासाच्या आधारे अटक करण्यात आली.
तसेच सूरज मुन्नालाल चिकवा (वय ३२, रा. विक्रोळी, मुंबई, मूळ रा. चित्रकूट, उत्तर प्रदेश) आणि राजा अशोक कुमार (वय ३१, रा. ठाणे पश्चिम, मुंबई, मूळ रा. वैशाली, बिहार) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या नावावर सिमकार्ड, सायबर टोळ्यांना पुरवठा!
पोलिस तपासात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिमकार्ड विक्रीच्या प्रक्रियेत ग्राहकांच्या नावावर सिमकार्ड घेऊन, ओटीपी एक्सपायर झाल्याचे किंवा सर्व्हरमध्ये अडचण असल्याचे खोटे कारण सांगून संबंधित ग्राहकांना सिमकार्ड न देता ती सिमकार्ड सायबर फसवणूक करणाऱ्या साथीदारांना पुरवली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या सिमकार्डचा वापर बनावट ई-मेल आयडी तयार करणे, बनावट ॲप्लिकेशनची नोंदणी करणे, बँक खात्यांना लिंक करणे आणि ऑनलाइन फसवणुकीचे व्यवहार करण्यासाठी केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींनी पुरविलेल्या सिमकार्डचा डेटा आणि त्यांचा इतर किती सायबर गुन्ह्यांमध्ये वापर झाला आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली.
vishwanathkeswad