ग्रामसेवकांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह! दिव्यांग प्रमाणपत्रांच्या कथित गैरवापराचा संशय; ११ ग्रामसेवक रडारवर!

ग्रामसेवकांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह! दिव्यांग प्रमाणपत्रांच्या कथित गैरवापराचा संशय; ११ ग्रामसेवक रडारवर!

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड 

खेड,

पुणे जिल्ह्यात ग्रामसेवकांच्या कारभाराबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. दिव्यांग प्रमाणपत्रांच्या कथित गैरवापरप्रकरणी जिल्ह्यातील तब्बल ११ ग्रामसेवक प्रशासनाच्या रडारवर आले असून, वैद्यकीय फेरतपासणीत हे ग्रामसेवक अपात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शासकीय सेवेत दिव्यांग आरक्षणाचा किंवा संबंधित सवलतींचा गैरफायदा घेतला गेला का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमधील ग्रामसेवकांची नावे या प्रकरणात पुढे आली आहेत.

पंचायत समितीनिहाय संशयित ग्रामसेवकांची संख्या :

- खेड – २

- हवेली – २

- इंदापूर – २

- पुरंदर – २

- मावळ – १

- शिरूर – १

- बारामती – १

विशेष म्हणजे खेड तालुक्यातील दोन ग्रामसेवकांच्या प्रकरणाकडे आता विशेष लक्ष लागले आहे. वैद्यकीय फेरतपासणीत अपात्र ठरल्याची माहिती समोर येत असताना संबंधित प्रमाणपत्रे कोणत्या वैद्यकीय प्रक्रियेतून मिळवली गेली, त्यांची पडताळणी कोणी केली आणि त्याआधारे कोणते शासकीय लाभ घेतले गेले, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

दिव्यांगांच्या हक्कांशी खेळ करणाऱ्यांना पाठीशी का घालायचे?

खऱ्या दिव्यांग व्यक्तींना आजही शासकीय योजनांचा लाभ मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत दिव्यांग प्रमाणपत्रांचा कथित गैरवापर झाल्याचा संशय निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. जर या प्रकरणात गैरप्रकार सिद्ध झाला, तर संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

दिव्यांगांच्या हक्कांवर गदा आणणारा कोणताही प्रकार खपवून घेतला जाऊ नये. मात्र, कोणावरही अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत अहवाल आणि संबंधितांची बाजू समोर येणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार? ११ ग्रामसेवकांच्या प्रकरणात कारवाईचा बडगा उगारणार की चौकशी कागदावरच राहणार? याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.