पोलीस दलात खळबळ पोलीस कर्मचाऱ्याचा आयुक्तांच्या बंगल्यावर राडा! थेट गेट तोडून गाडी आत; अर्धा तास गोंधळ
प्रतिनिधी पुणे
पुणे : पुणे पोलीस दलातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर एका पोलीस कर्मचाऱ्याने गोंधळ घातल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल भिसे या पोलीस कर्मचाऱ्याने कथितरीत्या दारूच्या नशेत चारचाकी वाहन थेट पोलीस आयुक्तांच्या बंगल्याच्या गेटवर धडकवले. या धडकेत गेट तोडून वाहन आत घुसल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने सुमारे अर्धा तास गोंधळ घातल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मनासारखी बदली न झाल्याच्या नाराजीतून हा प्रकार घडल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. तसेच पोलीस दलातील कामकाज आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.
या घटनेप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानावरच असा प्रकार घडल्याने पुणे पोलीस दलाच्या शिस्तीचा आणि अंतर्गत व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आयुक्तांच्या बंगल्याचे गेट तोडण्यापर्यंत एका पोलीस कर्मचाऱ्याची मजल कशी गेली? बदलीच्या नाराजीतून हा प्रकार घडला की यामागे आणखी काही कारण आहे? या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
vishwanathkeswad