पायल झांबरे मृत्यू प्रकरणात पोलिसांची भूमिका स्पष्ट! DCP मिलिंद मोहितेंचा मोठा खुलासा; सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील नामांकित झांबरे कुटुंबातील सून पायल झांबरे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून, परिमंडळ क्रमांक २ चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना पोलिसांची भूमिका स्पष्ट केली आहे.
प्राथमिक तपासात पायल झांबरे यांनी गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींकडून मारहाण आणि हुंड्यासाठी छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.
मृतदेहाचे ससून रुग्णालयात इन-कॅमेरा पोस्टमार्टम करण्यात आले असून, फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. तसेच सासरच्या मंडळींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर झांबरे पॅलेस परिसरात झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणानेही वातावरण तापले आहे. या घटनेतील संबंधितांची ओळख सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुकुंद नगर परिसरात एसआरपीएफसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आता या प्रकरणातील पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक अहवालात नेमके काय निष्पन्न होते, तसेच नातेवाईकांनी केलेल्या आरोपांच्या तपासातून कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण पुणे शहराचे लक्ष लागले आहे.
vishwanathkeswad