चाकणमध्ये वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश! परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना पाच आरोपी जेरबंद; स्कॉर्पिओसह दोन दुचाकी जप्त
चाकण | प्रतिनिधी: विश्वनाथ केसवड,
चाकण परिसरातून स्कॉर्पिओ गाडीची चोरी करून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना चाकण उत्तर पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. या कारवाईत चोरीची स्कॉर्पिओ गाडी आणि अन्य दोन चोरीच्या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चाकण उत्तर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान चाकण-शिक्रापूर रोडवरील आगरकर कॉम्प्लेक्स परिसरात फिर्यादी यांच्या राहत्या इमारतीसमोर पार्क केलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (MH 12 EG 0200) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सुमारे १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे चोरीला गेलेल्या स्कॉर्पिओचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान सदर गाडी तुळजापूर, अक्कलकोट, परळी आणि परभणी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आंबेठाण पोलीस स्टेशनच्या मदतीने तळेगाव परिसरात आरोपींचा शोध घेऊन स्कॉर्पिओ गाडीसह पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी आणखी दोन मोटारसायकलींची चोरी केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या दोन्ही मोटारसायकलीदेखील जप्त केल्या आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. महावीरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ मारुती जगताप, सहायक पोलीस आयुक्त चाकण विभाग सागर रंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत आर्दवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भाऊसाहेब डुंगळे तपास करीत आहेत.
vishwanathkeswad