दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे खुलेआम ! दारू अड्डे, गुटखा विक्री, जुगार अड्डे अन् अवैध गॅस रिफिलिंग सुरू; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष? CP साहेब लक्ष देणार का?
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
दक्षिण महाळुंगे : दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. अवैध दारू विक्रीचे अड्डे, गुटख्याची विक्री, जुगार अड्डे तसेच अवैध गॅस रिफिलिंगचा व्यवसाय सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे औद्योगिक परिसर म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या दक्षिण महाळुंगे परिसरात अशा बेकायदेशीर धंद्यांना खुलेआम थारा मिळत असल्याने स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दारू अड्ड्यांवर कारवाई कधी?
परिसरातील काही ठिकाणी अवैधपणे दारूची विक्री सुरू असल्याचे समोर येत असून, या व्यवसायामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित ठिकाणांवर नियमित कारवाई होते का, असा सवाल उपस्थित होत आहे.
गुटख्याची विक्री सुरूच
शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री सुरू असल्याचेही चित्र आहे. दुकानांमधून आणि इतर ठिकाणांहून गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने बंदीची अंमलबजावणी कागदावरच आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
जुगार अड्ड्यांवर कोणाचा वरदहस्त?
परिसरातील काही ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या अड्ड्यांमुळे तरुण वर्ग आणि कामगार वर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता असून, अशा ठिकाणांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
अवैध गॅस रिफिलिंगचा धोकादायक प्रकार
सर्वात गंभीर बाब म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरमधून अवैध पद्धतीने गॅस रिफिलिंग करण्याचा प्रकार सुरू असल्याचे समोर येत आहे. हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नाही तर परिसरातील नागरिकांच्या जीवितासाठीही धोकादायक ठरू शकतो. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
CP साहेब, आता थेट लक्ष द्या!
एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू, गुटखा, जुगार आणि अवैध गॅस रिफिलिंग असे विविध अवैध व्यवसाय सुरू असतील, तर याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त (CP) साहेब आता दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांकडे स्वतः लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणार का?
vishwanathkeswad