आळंदी FDA चा मिठाई विक्रेत्याला दणका! ३०३ किलो संशयित निकृष्ट बर्फी जप्त करून जागेवरच नष्ट ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई!

आळंदी FDA चा मिठाई विक्रेत्याला दणका! ३०३ किलो संशयित निकृष्ट बर्फी जप्त करून जागेवरच नष्ट ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई!

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड आळंदी,

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आळंदी धानोर (ता. खेड) येथील मिठाई विक्री केंद्रावर FDA ने छापा टाकत तब्बल ३०३ किलो संशयित निकृष्ट दर्जाची बर्फी जप्त करून जागेवरच नष्ट केली. या बर्फीची किंमत तब्बल १ लाख २१ हजार २०० रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी आळंदी–मरकळ रोडवरील धानोर येथील माऊली कॉम्प्लेक्समधील मे. आर. बिकानेर मिठाई या विक्री केंद्राची तपासणी केली. यावेळी दुकानात मोठ्या प्रमाणात बर्फीचा साठा आढळून आला.

तपासणीदरम्यान या बर्फीवर आवश्यक लेबलिंग नसणे, खरेदीची बिले उपलब्ध नसणे आणि बर्फी खोलीच्या तापमानावर साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा साठा संशयित निकृष्ट दर्जाचा असल्याने प्रशासनाने ३०३ किलो बर्फी जागेवरच नष्ट केली.

दरम्यान, दुकानात आढळलेल्या कलाकंद या मिठाईचा नमुना तपासणी व विश्लेषणासाठी घेण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी एच. आर. मारेवार यांनी केली. क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त एस. एन. चट्टे आणि सह आयुक्त (अन्न) एस. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

मिठाई विक्रेत्यांना FDA चा इशारा!

सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नपदार्थांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. मिठाई विक्रेत्यांनी अन्नपदार्थांची योग्य साठवणूक करावी, आवश्यक लेबलिंग करावे तसेच खरेदीची बिले आणि संबंधित कागदपत्रे उपलब्ध ठेवावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.